Type Here to Get Search Results !

संमेलनात ठराव मांडून सीमा भागातील मराठी भाषिकांना दिलासा द्यावा : प्रकाश मरगाळे

संमेलनात ठराव मांडून सीमा भागातील मराठी भाषिकांना दिलासा द्यावा : प्रकाश मरगाळे 


बेळगाव :  गेली 68 वर्षे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यालाही आता वीस वर्षे होऊन गेली आहेत. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक जनता आपल्या अस्तित्वाचा लढा निकाराने देत आहे. अशावेळी देशाच्या राजधानीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमा भाग तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा, अशा प्रकारचा ठराव मांडून सीमा भागातील मराठी भाषिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.


सीमाप्रश्णाच्या ठरावा संदर्भात अ.भा.मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाचे मुख्य आयोजक सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना ही पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे मरगाळे यांनी सांगितले.



 देशाच्या राजधानीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. याचा प्रत्येक मराठी भाषिकाला निश्चितच अभिमान आहे. या संमेलनातून मराठी भाषा संस्कृतीच्या चळवळीला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे‌ त्याचबरोबर वादग्रस्त सीमा भागात विशेष करून बेळगाव शहर व बेळगाव,खानापूर निपाणी तालुक्यात गेली 35 वर्षे 11 मराठी साहित्य संमेलने प्रत्येक वर्षी आयोजित केली जातात. त्यामध्ये एक बाल साहित्य संमेलनाचा सुद्धा समावेश आहे. आम्ही मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. वादग्रस्त सीमा भागात मात्र कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत आहे. सीमा भागातील मराठी भाषा व संस्कृती नष्ट होईल का? याची आता चिंता वाढू लागली आहे. कर्नाटक सरकारकडून लोकशाही व राज्यघटनेच्या सर्व तरतुदींचे उल्लंघन केले जात आहे. आमचा कन्नड भाषेला विरोध नाही पण,आमच्या मराठी मातृभाषेपासून आम्हा सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक जनतेला वंचित ठेवले जात आहे.

बेळगावात आत्तापर्यंत 1928 1946 व 2000 काळात तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन झाले आहे.अनेक वर्षे साहित्य संमेलनांमध्ये वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात यावा असा ठराव संमत करण्यात येत असतो.1959 मध्ये दिल्ली येथील साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला होता. आता पुन्हा दिल्ली येथे होणाऱ्या संमेलनात पुढील प्रमाणे ठराव संमत व्हावा अशी समस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेची कळकळीची विनंती आहे.

गेली 68 वर्षे महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. तसेच 20 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाचा दावा प्रलंबित आहे.ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. तेव्हा... खेडेघटक... भौलोगिक सलगता... सापेक्ष बहुभाषिकता व लोकेच्छा या सर्वसामान्य व जगमान्य तत्वांचा अवलंब करून,हा वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यांमध्ये सामील करावा. अशा प्रकारचा ठराव दिल्लीच्या साहित्य संमेलनात करण्यात यावा. अशीच बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांची मनापासून इच्छा आहे,असेही मरगाळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या