Type Here to Get Search Results !

आता आपली अस्मिता कोणाकडेही गहाण राहणार नाही, याची दक्षता घ्या : आमदार पाटील


आता आपली अस्मिता कोणाकडेही गहाण राहणार नाही, याची दक्षता घ्या : आमदार पाटील

 बेळगाव : सीमा चळवळ ही घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहायला हवे. अनेक पिढ्यांनी या लढ्यात आपले योगदान दिले आहे. देशभरातील अनेक चळवळी वाईट स्थितीत आहेत पण सीमावर्ती भागातील लोकांनी आपली अस्मिता जागृत ठेवण्याचे काम केलं पाहिजे. गेल्या अनेक पिढ्यांचा हा लढा विशिष्ट पद्धतीने पुढे न्यावा लागेल. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मात्र, आता आपली अस्मिता कोणाकडेही गहाण राहणार नाही, याची दक्षता घ्याअसे, मत तासगाव कवठेमहाकाळचे आमदार रोहित आर. पाटील यांनी व्यक्त केले.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत. आमदार पाटील आणि प्रा. मधुकर पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले गेले .युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर अध्यक्षस्थानी होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले की सीमा भागातील जनतेने नेहमीच आर आर आबांवर प्रेम केले आहे तसेच प्रेम त्यांनी माझ्यावरही केले. आबांचे सीमा भागावर विशेष प्रेम होते पण त्यांच्यापेक्षा काकणभर सरस माझे प्रेम सीमा भागावर आहे. आदिलशाहीने ज्या पुण्याची राख केली होती, त्याच ठिकाणी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडविले. स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे आपल्यातील अस्मिता जागी करण्यासाठी जिजाऊ जयंती सारखा दुसरा दिवस नाही. आता आपली अस्मिता कोणाकडेही गहाण राहणार नाही, याची दक्षता घेऊन संघर्ष केल्यास प्रश्न तडीस गेल्याशिवाय राहणार नाही. युवकांनी आपली पिढी या लढ्यात संपणार नाही, याचा निर्धार करून कामाला लागावे, असे आवाहन आमदार रोहित पाटील यांनी केले.



यावेळी बोलताना प्रा. मधुकर पाटील यांनी मराठी माणसाला दैदिप्यमान इतिहास आहे मराठी माणसाने इतिहास वाचायला हवा इतिहास वाचणारी माणसं इतिहास घडवू शकतात. मराठी माणसांनी एकत्र येऊन उद्योग धंद्यात पुढं गेलं पाहिजे. मराठी माणसाचे एकत्रीकरण करून संघर्षाची धार तीव्र केली पाहिजे असे विचार व्यक्त केले.सुरुवातीला आमदार रोहित पाटील यांनी राजमाता जिजाऊ तर प्राध्यापक मधुकर पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. व्यासपीठावर तालुका समिती अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. एम. जी. पाटील, रमाकांत कोंडुसकर, तालुका समिती कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, माजी आमदार दिगंबर पाटील, शुभम शेळके, वक्ते प्रा. मधुकर पाटील, अ‍ॅड. श्रुती सडेकर उपस्थित होते. मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक केले तर शंकर कोणेरी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या