बसरीकट्टी महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ ; रथोत्सव मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी
बेळगाव, ता. १४ : ढोल ताशांचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करत बसरीकट्टी महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. संपूर्ण गावातून मोठ्या जयघोषात देवीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आज सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाली. गुरुवारी (ता.१५) ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. आज भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
आज ( ता.१४) सूर्योदयापूर्वी अक्षतारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला व बालक यांच्यासह सर्व पाहुणे उपस्थित होते. गावचे मानकरी विक्रम देसाई यांच्या हस्ते मंगळवारी ग्रामदेवतेची पूजा करण्यात आली. तसेच गावातील विविध देवतांचीही पूजा करण्यात आली आज यात्रेचा मुख्य दिवस होता. देवीची मूर्ती रथामध्ये बसविण्यात आली त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक संपल्यानंतर नियोजित ठिकाणी देवी पूजा आणि धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवी गदगेवर विराजमान झाली. उद्या (ता.१५) देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या