बाबासाहेब प्रतिमा विटंबने प्रकरणी राज्यपालांना निवेदन
बेळगाव, ता. १ : कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना राज्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक दलित युवा संघटना, चलवादी युवा संघटना व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक दलित युवा संघटना, चलवादी युवा संघटना व भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी राज्यपालांच्या नावे उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदन स्वीकारून ते त्वरित राज्यपालांकडे धाडण्याचे आश्वासन दिले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये गेल्या 22 जानेवारी रोजी रात्री कांही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे. तेंव्हा त्या समाजकंटकांवर कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच त्यांना राज्यातून हद्दपार करण्यात यावे. कलबुर्गी जिल्ह्यातील निंद्य घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
कर्नाटक सरकारवर आमचा विश्वास असून आमच्या मागणीनुसार कारवाई केली जाईल, अशी आशा कोलकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी यल्लाप्पा कोलकार, महांतेश मॅगीनमनी, सुनील बस्तवाडकर, मारुती कांबळे, भरत कोलकार, विठ्ठल केळवार, अजित कांबळे, मंजुनाथ कांबळे, महेश हुवनावर, दीपक मेत्री, अशोक कांबळे, शिवराज मोदगी, इराप्पा मेत्री आदींसह बहुसंख्य दलित कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या