Type Here to Get Search Results !

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्म्यांना व भाई एन. डी. पाटील यांना अभिवादन

 खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्म्यांना व भाई एन. डी. पाटील यांना अभिवादन



खानापूर, ता. १७ : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने  हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात आले. खानापूर स्टेशन रोड येथील हुतात्मा स्मारकाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सीमा लढ्यात हुतात्म्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्मरण करून त्यांना व भाई एन.डी. पाटील यांना त्यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. 



यावेळी  खानापूर समितीचे अध्यक्ष व मध्यवर्ती समितीचे संस्थापक सदस्य सूर्याजी पाटील म्हणाले गेल्या 68 वर्षापासून मराठी भाषिकांचा लढा केंद्र सरकार विरोधात सुरू आहे. जोपर्यंत मराठी भाषिकांना न्याय मिळून त्यांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत  मराठी भाषिकांचा लढा असाच  तेवत ठेवणार असे सांगितले. खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात रेंगाळत पडलेला आहे. महाराष्ट्र सरकारने आपली बोटचेपी भूमिका सोडून सीमावासीयांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी व सीमावासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी केंद्र सरकारवर दबाव वाढवून हा प्रश्न निकाली काढावा व मराठी माणसांची या जाचातून सुटका करावी. 

माजी सभापती सुरेशराव देसाई यांनी आमची भाषा संस्कृती व आमच्या मायबोलीच्या राज्यात जाण्याची न्यायिक मागणी आम्ही करीत आहोत. यात चूक काय, लवकरात लवकर न्याय व्हावा, अशी मागणी केली. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाभागातील पहिले हुतात्मे नागाप्पा होसुरकर यांना अभिवादन करतांना सीमाप्रश्नांची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल याचे स्मरण करून अभिवादन केले, यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, पी. एच. पाटील, गजानन पाटील, रामचंद्र पाटील, महादेवन निलजकर, भगवंत बावकर, अर्जुन धबाले, भुपाल पाटील, परशुराम पाटील, तुकाराम पाटील, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या