ड्रेनेज चेंबरमध्ये आढळले तीन महिन्याचे अर्भक
बेळगाव, ता. १९ : कंग्राळ गल्लीतील एका ड्रेनेज चेंबरमध्ये 3 महिन्यांचे अर्भक सापडल्याचे वृत्त असून, एकच खळबळ माजली आहे. कृत्याबद्दल लोकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळ गल्लीतील ड्रेनेजवाहिनी तुंबल्याची तक्रार आल्याने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी तेथे गेले असता, त्यांना साधारण 3 महिन्यांचे अर्भक दिसून आले. त्यांनी तत्काळ स्थानिक नगरसेवक शंकर पाटील व रहिवाशांना याची माहिती दिली. ड्रेनेज चेंबरमध्ये पाणी ओतून साफ करताना कथित अर्भक पाईपमध्ये अडकल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सफाई कर्मचारी सुरेश यांनी सांगितले की, ड्रेनेज चेंबर ब्लॉक झाल्याची तक्रार आल्याने ते क्लीअर करण्यासाठी आम्हाला पाठवले होते. तिन्ही चेंबर साफ केले. त्यावेळी मधल्या चेंबरमध्ये बाहुलीसारखे काहीतरी दिसले. म्हणून आजूबाजूच्या घरातील महिलांना बोलावून दाखवले. पाणी ओतल्यावर ते स्पष्ट दिसेल म्हणून तिन्ही चेंबरमध्ये पाणी ओतले. त्यावर ते पाण्याच्या प्रेशरने ड्रेनेज पाईपमध्ये अडकून बसले.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांनी सांगितले की, कंग्राळ गल्लीत ड्रेनेज चेंबर चोकअप झाल्याची तक्रार आल्याने कामगार पाठवले होते. त्यांनी ड्रेनेज लाईन साफ केली होती. त्यानंतर आज पुन्हा तक्रार आल्याने कामगारांना पाठवले असता, सफाईवेळी अर्भक दिसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच असा अनुभव आल्याने आम्हाला पुढे काय करायचे माहिती नाही. त्यामुळे आम्ही मनपा आरोग्याधिकाऱ्यांना कळवले आहे. ते आल्यावर पुढे काय करायचे याचा निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या