रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
बेळगाव, ता. १६ : बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण काही वर्षपासून सुरू आहे. कंत्राटदारांनी या कामा संदर्भात महाराष्ट व कर्नाटक या सीमावर्ती भागातील कामगार आणलेले आहेत. त्यामध्ये पुरुषांबरोबरच महिलाही आपल्या तान्हुल्यांसह उदरनिर्वाहासाठी कार्यरत असतात. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावात कडाक्याची थंडी पडली असून या कामगारांच्या लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री पासून सकाळी थंडीत कुडकुडत असलेल्या या महिला व त्यांच्या तान्हुल्यांची ही परवड सकाळी सकाळी आपल्या नित्यनियमाप्रमाणे कामावर जाणाऱ्या महिला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. आपणही समाजाचे काही देणे लागतो. या सामाजिक बंधीलकीतून त्यासाठी त्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विविध प्लॅटफॉर्म वर आपल्या घरातील मुलांचे,महिलांचे व पुरुषांचे स्वेटर,जॅकेट,शर्ट,पॅन्ट,साड्या, शॉल,असे उबदार कपडे त्या कामगारांना आणून दिले. हे पाहून त्या कंत्राटी कामगार महिलांच्या चेहऱ्यावर हसू आले व त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वनश्री जाधव-पाटील, जयश्री भगत, रेखा, रेश्मा व इतरांनी हा उपक्रम राबविला. आपल्या दैनंदिन व सांसारिक कामाच्या व्यपातून रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे उपस्थित रेल्वे प्रवाशातून कौतुक होत होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या