कॅन्टोन्मेंट बोर्डवर सीबीआयची छापा ; नोकर भरती प्रकरण येणार चव्हाट्यावर
बेळगाव, ता. १८ : कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नोकर भरती करताना विविध खात्यात भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार कॅन्टोन्मेंट बोर्ड सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत सीबीआयचे पथक शनिवारी सकाळपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात दाखल झाले असून सीई ओ आनंद के.सह इतर अधिकाऱ्यांची बंद खोलीत चौकशी करण्यात आली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून चर्चेत असलेले कॅन्टोन्मेंट बोर्डचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार का ?अशी कुजबूज कॅन्टोन्मेंट बोर्ड वर्तुळात सुरू आहे. 2021 पासून झालेल्या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली. होती. यापूर्वी देखील सीबीआयच्या पथकाने कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला धडक देत भरती प्रकरणातील संबंधित कागदपत्राची चौकशी केली होती. मात्र यावेळी थेट दिल्लीहून सीबीआय पथक बेळगावात दाखल झाल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे. गेल्या महिन्यात कामगाराचा पगार न झाल्यामुळे कारभार चव्हाट्यावर आला होता. आता कामगारांचे पगार व पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा झाली असून कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील खात्यात पगार जमा झाला आहे. मात्र भरती प्रकरण चौकशी सुरू झाल्याने अलीकडे भरती झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या