Type Here to Get Search Results !

बालप्रतिभावंतांकडून मराठीचा जागर

 

बालप्रतिभावंतांकडून मराठीचा जागर




बेळगाव : बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज बालप्रतिभावंतांकडून मराठी साहित्याचा जागर करण्यात आला. निमित्त होते, वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे. वाचनाची आवड जोपासा, ज्ञानाच्या कक्षा वाढवा असे आवाहन संमेलनाचे उदघाटक उद्योजक एम. एन. राजगोळकर यांनी केले.

बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज शनिवारी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शानदार ग्रंथ दिंडी, त्या दिंडी मिरवणुकीत महापुरुषांच्या आणि पुढे कोण होणार हे सांगणाऱ्या व्यावसायिकांच्या वेशभूषा परिधान केलेला, उत्साहाने सळसळलेला बालचमू, दिंडीपुढे आकर्षिक लेझीम खेळणारी चिमुकली मुले अशा भारदस्त वातावरणात संमेलनाच्या प्रारंभी दिंडी काढण्यात आली. मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणातून गोगटे रंगमंदिरापर्यंत काढलेल्या या दिंडीत लहान मुलांनी विविध प्रबोधनकारी संदेश देणारे फलक आणि मराठी साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारकांच्या प्रतिमांचे फ हाती धरले होते.

संमेलनाच्या उदघाटन समारंभात व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. द. तु. पाटील, उदघाटक एम. एन. राजगोळकर, वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, चित्राताई पाटणकर, अरुण पाटणकर, ,विद्यार्थी प्रतिनिधी समृद्धी पाटील, मधुरा मुरकुटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालसाहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना उदघाटक एम. एन. राजगोळकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला. विद्यार्थी दशेत वाचनाची आवड जोपासून ज्ञानाच्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. महापुरुषांच्या चरित्रांसह छत्रपती शिवरायांचे चरित्र एकदा तरी मुलांनी वाचले पाहिजे. त्यामुळे संकटातून कसा मार्ग काढायचा याची शिकवण मिळते. त्याशिवाय सामान्यज्ञान वाढवून स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी दररोज योगा आणि मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणे सोपे जाते असा कानमंत्र राजगोळकर यांनी दिला.

प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. कुशल गोरल याने प्रास्ताविक केले. प्रथमेश चांदिलकर आणि अथर्व गुरव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. उदघाटन समारंभानंतर कथाकथन, रानातल्या कविता, कवी संमेलन अशी सत्रे झाली. त्यांचे सूत्रसंचालन अनुक्रमे बी. बी. शिंदे, शिवराज चव्हाण, हर्षदा सुंठणकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणाच्या सत्रात संमेलनाध्यक्ष द. तु. पाटील यांनी संबोधित केले. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन शीतल बडमंजी यांनी केले. गजानन सावंत यांनी आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या