धडाडीचा समाजसेवक, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कै सुभाष हदगल..
बेळगुंदी येथील रहिवासी, बेळगुंदी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष, बालवीर अर्बन सोसायटीची माजी चेअरमन व संचालक, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, आणि राजकीय अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, धडाडीचे समाजसेवक सुभाष खाचू हदगल (वय 56)यांचे दि. 3 रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. आज रविवार दि. 13 रोजी त्यांचा अकरावा दिवस. यानिमित्त त्यांच्याविषयी..
बेळगुंदी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री खाचू सुबराव हदगल व सौ कल्पना खाचू हदगल यांना दि 3 जुलै 1968 रोजी पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव सुभाष असे ठेवण्यात आले. सुभाष यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती व सैन्य दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती.
जी एस एस कॉलेजमध्ये बारावीला असताना त्यांची सैन्य दलामध्ये निवड झाली आणि त्यांचे लहानपणाचे स्वप्न साकार झाले.देशसेवा करत असताना वेहिकल मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. तसेच दक्षिण आफ्रिकेतील रवांडा या ठिकाणी त्यांनी तीन वर्षे सेवा केली.
सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर बालवीर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली. कै. वाय.बी चौगुले सरांच्या मार्गदर्शनाने बालवीर अर्बन सोसायटी चालू करण्यासाठी पुढाकार घेतला. ते बालवीरमध्ये सोसायटीचे संस्थापक संचालक होते. त्यानंतर काही कालावधी त्यांनी या संस्थेसाठी चेअरमन म्हणूनही काम केले. तसेच ते बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक होते .बालवीर महिला सोसायटी व बालविर विद्यानिकेत यांच्या कार्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एकंदरीतच बालवीरच्या जडणघडणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच ते हिंदवाडी येथील फॉर्च्यून सोसायटीचे चेअरमन व बेळगुंदी येथील महात्मा फुले सोसायटीचे मार्गदर्शक होते.
त्यांना समाजकार्याची आवड होती जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली व ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. ते गावातील एक पंच म्हणून कार्य करत होते .कोणाच्याही मदतीला ते नेहमी धावून जात असत. लहान मोठी भांडण तंटे सोडवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असायची. रवळनाथ देवस्थान कमिटीचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्याच काळात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. तसेच ते पंढरपूर येथील भक्त निवास कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच त्यांची पत्नी हेमा सुभाष हदगल यांनीही ग्रामपंचायत मध्ये अध्यक्ष म्हणून काम केले आहे .सध्या त्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी विविध राजकीय पक्षामधून कार्य केले. राजकीय पक्षांमधून कार्य करताना त्यांचा संपर्क मोठमोठ्या नेत्यांशी आला. या सर्व नेत्यांबरोबर त्यांचे अगदी जवळचे संबंध होते.
त्यांनी आपल्या गावात स्वतःची काजू फॅक्टरी सुरू केली. या काजू युनिटच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
सामाजिक कार्य करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा आकाश याने बीई (ईएनसी) पूर्ण केले आहे. आज त्याने आपल्या मित्रांच्या सोबतीने स्वतःची अविष्कार कंपनी सुरू केली आहे. तसेच तो नोकरीही करतो आहे. दुसरा मुलगा आतिश याने बीसीए पूर्ण केले आहे. आज तो विप्रो कंपनीमध्ये नोकरी करतो आहे. मुलगी रेखा(रती) ही हुबळी मधील बीव्हीबी कॉलेजमध्ये बीई मेकॅनिकल करत आहे. त्यांचा भाऊ परशराम हे विमा प्रतिनिधी व बालवीर संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. तसेच लहान भाऊ मोनाप्पा यांचा स्वतःचा सुपम ट्रॅव्हल्स हा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांनाही चांगले शिक्षण दिले आहे. एकंदरीत सर्व कुटुंबाची प्रगती उत्तम आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्याने हदगल परिवारामध्ये तसेच बेळगुंदी गावांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. बेळगुंदी गावाने एक सच्चा समाजसेवक गमावला आहे.त्यांनी नेहमी समाज हितासाठी कार्य केलेले आहे. त्यांचे कार्य नेहमीच आमच्या स्मरणात राहील. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सुभाष हदगल यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली.
-- बालवीर परिवार, बेळगुंदी



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या