युवा समितीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार
बेळगाव, ता. ३१ : केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या आयुक्तांना आपल्या राज्यात जे भाषिक अल्पसंख्यांक नागरिक आहेत. त्या सर्व नागरिकांना निवडणूक संदर्भात देण्यात येणारी सर्व कागदपत्रे त्यांच्या भाषेत पुरवण्यासाठी सक्त आदेश दिले. तरी देखील प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश डावलून केवळ कानडीतून मतदार याद्या उपलब्ध केल्या आहेत. परिणामी युवा समितीने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
या आदेशाला राज्य निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवत. मागील वर्षी देखील प्रशासनाने केवळ कानडी भाषेत मतदार याद्या उपलब्ध केल्या. परिणामी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देऊन मराठी मतदार याद्या पुरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा आदेश देताच प्रशासनाने मराठी याद्या उपलब्ध दिल्या. लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असून यंदा देखील प्रशासन जाणून बुजून मराठीला डावलून केवळ कानडी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बेळगाव प्रशासनाक्या विरोधात तक्रार दाखल केली. मतदार याद्या मराठीमध्ये द्याव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाला तसेच बेळगावच्या प्रशासनाला आदेश करावेत. अशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. याबाबत सोबत मतदान नोंदणी अर्ज, उमेदवारी अर्ज तसेच निवडणूक कागदपत्रे मराठीत पुरवावीत अशी मागणीही या तक्रारी पत्रामध्ये करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या