सुळगा (हिं.) येथे आढळलेल्या मनोरुग्ण युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल
बेळगाव, ता. ३ : कुटुंबियांशी झालेल्या वादातून रागाने घराबाहेर पडलेल्या आणि सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील वेंगुर्ला रोडवर आढळलेल्या त्या मनोरुग्ण युवकाची अखेर जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली. रामशिष राकेश यादव (वय अंदाजे १८ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त झालेली माहिती अशी की, रामशिष यादव हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून वडिलांशी वाद झाल्यानंतर रागाने तो घराबाहेर पडला. यावेळी मानसिक संतुलन बिघडल्याने कोणताही विचार न करता मिळेल त्या रेल्वेने प्रवास करत बेळगावला पोहोचला. शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी रात्री भरकटल्याने तो सुळगा (हिं.) वेंगुर्ला मार्गावर वास्तव्यास होता. रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी चौकशी केली असता, त्याने शिवीगाळ करत दगड उचलून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान ग्रा. पं. सदस्य महादेव कंग्राळकर व फकीरा कदम यांनी या घटनेची माहिती सुळगा येथील ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांना दिली. माहिती मिळताच शट्टूप्पा पाटील यांनी हायवे पेट्रोलिंग (महामार्ग गस्तीवरील) पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना संपर्क साधला. यानंतर पोलिसांसह अवधूत तुडवेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले,आणि त्या युवकाची चौकशी करून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी १०८ रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. यानंतर पोलिसांच्या मदतीने ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूपा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्या युवकाची जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी कुटुंबियांशी केलेल्या चर्चेनंतर रामशिषचा भाऊ त्याला गावी परत नेण्यासाठी रवाना होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या