हलग्या जवळील दुहेरी अपघातात कारचे मोठे नुकसान
सुदैवाने कार मधील तिघे बचावले; किरकोळ जखमी
बेळगाव, ता. २२ : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग हालगा येथील ब्रीज वर दुहेरी अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. कार मध्ये बसलेले तिघेही किरकोळ जखमी झाले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून ते तिघे बचावले.
गुरुवारी ( ता.२१ ) रात्री साडे दहाच्या दरम्यान हा अपघात झाला. घटनास्थळावरून व स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुहेरी होता. सुरुवातीला त्या ब्रिजवर टायर फुटून ऊसाचा ट्रक पलटी झाला होता. त्या ट्रकच्या अगोदर 100 फुटाच्या अंतरावर कॅन्टर थांबला होता.
थांबलेल्या कॅन्टरला पाठीमागून कारने जोराची धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला. पण कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही. अपघातात अडकलेल्या कारला क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले. घटनास्थळी हिरेबागेवाडी पोलिसांनी तातडीने भेट देऊन पंचनामा केला. रात्री अपघात स्थळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या