Type Here to Get Search Results !

बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी

 

बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेसाठी 

विधानपरिषद सदस्यांकडून मागणी



बेळगाव, ता. २० : बेळगाव मधील लोकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी असलेली बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती आपण सेंट्रल रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा यांच्याकडे केली असल्याची माहिती कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी व विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.


नवी दिल्ली येथे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी नुकतीच सेंट्रल रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना बेळगाव -पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याबाबतचे निवेदन सादर केले. बेळगाव हे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे तसेच कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांना जोडणारे महत्त्वाचे शहर आहे.

साखर कारखान्यांसह एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बेळगावची लोकसंख्या सुमारे 1 लाख इतकी आहे. महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या बेळगावमध्ये 5 वैद्यकीय महाविद्यालय, 9 अभियांत्रिकी महाविद्यालयांसह प्रतिष्ठित विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ आहे. नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने बेळगावचे पुणे शहराशी फार जुने संबंध असल्यामुळे असंख्य लोक दररोज पुण्याला ये -जा करत असतात.

सध्याच्या घडीला बेळगावहून पुण्याला नियमीत रेल्वे सेवा नाही. त्यामुळे बहुतांश लोकांना खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सदर गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी आणि तशी घोषणा येत्या अर्थसंकल्पात केली जावी, अशा आशयाचा तपशील विधान परिषद सदस्य हुक्केरी यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

माझ्या निवेदनाचा स्वीकार करून जय वर्मा सिन्हा यांनी बेळगाव - पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. बेंगलोर - धारवाड वंदे भारत रेल्वेचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यात आला असून या रेल्वेच्या उद्घाटन समारंभास सिन्हा यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या