जिल्ह्यात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
येत्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत राज्यात आणि बेळगाव जिल्ह्यात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही अशी अपेक्षा आहे. वेळ आल्यास त्यासाठी अधिकाधिक निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिली आहे. केंद्राकडे अधिक दुष्काळी निधीची मागणी केली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगावात सुवर्णसौधमध्ये आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, अवर्षणामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. त्यावर सरकार उपाययोजना करत आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आणि चाऱ्याचा साठा उपलब्ध आहे. चारा निर्यातीवर बंदी घातली आहे. पिण्यासाठी पुरेल इतके पाणी राखून ठेवूनच कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. तरीही टंचाई जाणवल्यास अधिक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे अधिक दुष्काळी निधी देण्याची मागणी केली आहे. जर केंद्राने वेळेत निधी दिला तर शेतकऱ्यांचे हाल आणि नुकसान टळेल असे त्यांनी सांगितले.
बेळगाव अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त करून मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना अधिवेशन यशस्वी करण्याचा अनुभव आहे. तो यावेळीही उपयोगी पडेल. अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा झाली पाहिजे. अनेक महत्वाचे लोक कल्याणकारी प्रकल्प रेंगाळले आहेत. त्यांना गती देण्यासाठी अधिवेशनात चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुवर्णसौधच्या देखभालीसाठी १२० कर्मचारी नेमले आहेत. सरकारदेखील देखभालीसाठी करोडो रुपये खर्च करत आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे असे ते म्हणाले. सुवर्ण सौधमध्ये राज्यस्तरीय सरकारी कार्यालये स्थलांतरित करणे कठीण आहे. एक भाग बेंगळुरात अन दुसरा भाग बेळगावात असे करून चालणार नाही. त्यामुळे प्रशासनात अडचण येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी टीम इंडियाला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार परिषदेला आ. महेंद्र तम्मण्णावर, आ. विश्वास वैद्य, चिक्कोडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते.
------------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या