शहापूर बुरुड गल्लीतील किल्ला प्रतिकृतीचे पूजन
बेळगाव, ता. २८ : नाथ पै सर्कल, शहापूर येथील बुरुड गल्लीमध्ये बाळगोपाळांनी साकारलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीला श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष व म. ए. समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट देऊन प्रशंसा केली.
दीपावलीनिमित्त शहापूर बुरुड गल्लीतील लहान मुलांनी पाण्याचा खंदक असलेली किल्ल्याची भव्य अशी लक्षवेधी प्रतिकृती तयार केली आहे. कौतुकाचा विषय झालेल्या या किल्ल्याच्या प्रतिकृतीला काल सोमवारी सायंकाळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि किल्ल्याचे पुष्पहार घालून पूजन झाले. किल्ल्याची प्रतिकृती पाहून कोंडुसकर यांनी प्रशासोद्गार काढून बुरुड गल्लीतील बालचमुची पाठ थोपटली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले तसेच वीर मावळ्यांच्या बलिदानातून जिंकलेले गड-किल्ले म्हणजे वर्तमान आणि भविष्य काळात सतत प्रेरणा देणारी तीर्थस्थळं आहेत. बालकांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती त्यांच्या मनावर समाज हितासाठीच आपण जगले पाहिजे, हा संस्कार घडविण्यात योगदान देत राहणार यात शंकाच नाही, असे रमाकांत कोंडुसकर यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी बाल चमूसह श्रीराम सेना हिंदुस्तानचे अन्य पदाधिकारी गल्लीतील युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या